निर्यात शुल्क हटल्यावरही कांद्याचे भाव पडलेलेच   

शेतकर्‍यांमध्ये नाराजी  

मंचर, (वार्ताहर) : केंद्र सरकारने निर्यात बंदी शुल्क हटल्यावर कांद्याचे  बाजारभाव वाढेल, अशी शेतकर्‍यांमध्ये असलेली आशा फोल ठरली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली, तरी आजघडीला कांदा केवळ १० ते १३ रुपये किलोच्या दरम्यान विकत असल्याने कांद्याचा उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.
 
मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. रब्बी हंगामात इतर पिकांपेक्षा कांद्यातून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती; मात्र कांद्याला भाव न वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजार समितीत सुमारे १००  ते १३० रुपये १० किलो प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. कांद्याची प्रत उत्तम असली तरी दर नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. बाजारभाव कमी असल्याने कांदा उत्पादकांचा पुरता वांदा केल्याने कांदा चाळीत साठवण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे.
 
काही शेतकर्‍यांना पुढील खरीप हंगामातील पिकाच्या भांडवली खर्चासाठी नाईलाजास्तव कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांद्याला योग्य दर मिळावा. यासाठी केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.    
 
 - बी. टी. बांगर, शेतकरी चांडोली
 
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क लादले होते. परंतु शेतकर्‍यांच्या विरोधानंतर एक एप्रिलपासून हे शुल्क हटवण्यात आले. त्यानंतर बाजारभाव वाढतील, अशी आशा शेतकर्‍यांना होती, मात्र एक एप्रिलपासून आजपर्यंत बाजारभाव जैसे थे आहेत.
 
- निलेश थोरात, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर
 
कांद्याला प्रती किलो २० ते २६ रुपये फेब्रुवारीमध्ये बाजारभाव होते. ते टिकून राहतील. असे सर्वच शेतकर्‍यांना वाटले होते; पण बाजारभाव कमी होऊन ते १० ते १३  रुपये किलोवर आले. त्यामुळे सर्वच शेतकर्‍यांनी चाळीत कांदा साठवणुकीवर भर दिला. भविष्यात बाजार वाढतील हीच अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.
 
- पप्पूशेठ येवले, शेतकरी कळंब

Related Articles